वैचारीक बंध जुळावेत...!

समाजात वावरत असतांना प्रत्येकांचा अनेक लोकांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबध येतोच. कधी ओळख, नोकरी, परिचय, नातेसंबध, मैत्री, यामाध्यमातून अनेकांशी आपला संबध निर्माण होतो. कधी कामानिमित्त फोन्स, मॅसेजेस याद्वारे ओळख निर्माण होत असते तर कधी एकमेकांना भेटणं, बोलणं तर एखादा दुस-याने ओळख निर्माण करुन दिली तर ओळख होते. तर कधी एकाद्या निमित्तानं संवादांची देवाण घेवाण होत असते. पुर्वी ही ओळख नात्यांपुर्तीच मर्यादित असायची. किंवा सहवासात असेलेल्यांशीस मर्यादित असायची. त्यास एका मर्यादेचं कुंपण होतं पण बदलत्या आधुनिक काळासोबत हे स्वरूप बदलत गेलं. एकमेकांच्या ओळखीच्या बदलाला व्यापकता प्राप्त झाली आहे.

वास्तवाप्रमाणेच सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतही अशाच प्रकारचा खटाटोप होतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगाात फेसबुक, वॉटसअप, किंवा सोशल मिडियाची इतर साधनं या माध्यमातून ओळख निर्माण करण्याचं नवं ट्रेड अलिकडच्या काळात निर्माण झालेला आहे. अनेकांना मैत्रीचं नवं नातं निर्माण करावंसं वाटतंयं. तर अनेकांना आपल्या विचारांशी जुळणाऱ्या लोकांशी विचारांची देवाण घेवाण करावीशी वाटते. अनेकांची हि फक्त ओळख असते एका मर्यादेपर्यंत... तर काहिचं घर, दार इथपर्यंत हि जाणं येणं असतं. अनेकांच्या ओळखीचं स्वरुप हे ओळखी पुरतचं मर्यादित राहतं तर अनेकांनी यातही आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकांचं व्यक्तिमत्व हे भिन्न भिन्न स्वरुपाचं असतंचं.

पोटाची खळगी भरण्यासाठी उदर निर्वाह करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या स्वरुपाचं काम करावचं लागतं. यात तिळमात्र शंका नाही. त्यानिमित्ताने अनेक परिचित, अपरिचित व्यक्तींशी संपर्क येतो. यातून ओळख तयार होते. या ओळखीन कधी कधी आपलं अवघड असणारही काम पुर्ण होतं. तर कधी कधी हिच ओळख आपणास अडचण निर्माण करणारी ठरते. हे हि आपण समजुन घ्यावं. पण ओळख असण्याचं बरचंसं काम होतं हे आपणास नाकारता येणार नाही.

आपली ओळख काय आहे हे जेव्हा तुम्हाला पक्कं माहीत असतं, तेव्हा तुम्ही जणू एका झाडासारखे असता ज्याची मुळं खोलवर रुजलेली असतात. आणि ते खूप मोठ्या वादळात देखील टिकून राहतं. वेदनेला संवेदनेचं चांगुलपण आलं की संवादाला वेगळचं स्वरुप प्राप्त होतं. हा संवाद अधिक वाढिस लागला की आपलेपण वाढतं. आपुलकीचं नात मनाच्या डहाळीवर उमलायला लागतं. विश्वास आत्मसात व्हायला लागतो. विचारांची देवाण देवाण अधिक व्हायला लागते. ओळखीच्या माध्यमातून अनेकांच नातं निर्माण होतं. हे नातं अनेक उंबरठे ओलांडणारे असतं. अनेकांच्या वैचारीकतेचे बंध जुळलेत की त्यांचं जगणं अधिक सोप होतं. यातून उच-निच, गरीब श्रीमंत, लहान मोठेपण गळून पडतं. इथं फक्त वैचारीक गोष्टीलाचं प्राधान्य दिलं जातं.

अनेकांच्या वैचारीकतेचे बंध जुळलेत सुखदु:खांची सहजतेनं वाटणी करता येते. आपलं मन समोरच्या व्यक्तीकडे बोलुन हलकं करता येतं. मनात दाटलेलं भाव भावनांचं विश्व खुलं करता येतं. मनात असलेली घालमेल सहजतेनं सोडविता येणं शक्य होतं. एकमेकांविषयी असलेलं मतभेदाचं विवरण बाजूला सारता येतं. अगदी मनासारखं भरभरुन जगता येतं. मन या डहाळीवरून त्या डहाळीवर स्वच्छंदी फिरतं. परंतू याकरीता समोरच्या व्यक्तीचंही मनही तसं असावं लागतं. एकमेकांना समजून घेणारं... डोळ्यात दाटलेल्या भावलेला जपणारं... ओठांवर आलेल्या शब्दांना आपलंसं करणारं... एकमेकांवर टाकलेल्या विश्वासास पात्र ठरविणारं...


एकमेकांच्या आपुलकीनं, आपलेपणानं होणारी विचारांची मांडणी ज्ञानाचं, मनाचं आणि मानाचं मोठपण व्यक्त करणारी ठरत असते. त्याकरीता एकमेकांची मने जपता यायला हवीत. वैचारीक मोठेपण हे मानवांच्या जिवंतपणाचं लक्षण असतं. मात्र वैचारीक मोठेपण कुणाकडे फारसं दिसत नाही. स्वत:च्या अस्तित्वापेक्षा इतरांच्या अस्तित्वालाही प्राधान्य देता यायला हवं. आपलं मन विस्तीर्ण सागरासारखं खुलं करता यायला हवं. असं जिवाभावाचं कुणीतरी आपलंसं असायला हवं. असं प्रत्येकाला मनोमन वाटत असतं. एकमेकांच्या विश्वासानं विचारांची बंध बांधली जावीत तेव्हाचं हे शक्य होतं. 

                                        - शिवाजी भोसले
                                        मो. 9689964143

Comments