विक्रमी रक्तदान शिबिरं : गत वर्षात ११ हजार पिशव्यांचे संकलन
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाशी संलग्नित असलेल्या रक्तपेढीच्या रक्त संकलनाने गत वर्षात ११ हजार ८ रक्त पिशव्यांचे संकलन केले. गत बारा वर्षातील हा उच्चांक आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. या रुग्णांना वेळप्रसंगी रक्ताची गरज भासते. रुग्णालयाशी संलग्नित असलेल्या रक्तपेढीचा रक्त संकलनाचा आलेख हा दरवर्षी उंचावत असल्याचे दिसून येत आहे. .गेल्या तीन वर्षांच्या काळात रक्त पिशव्यांच्या संकलनाने १० हजारांपेक्षा अधिक रक्त संकलन करीत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
यामध्ये प्रामुख्याने २०१६ ते २०१८ या तीन वर्षाच्या काळात सर्वाधिक ३० हजार ६८१ रक्त संकलन करण्यात आले आहे, तर वर्ष २००६ ते २०१३ या कालावधीत हा आकडा वर्षभरात पाच हजार रक्त पिशव्या संकलन एवढाच होता. त्यानंतर मात्र रक्त संकलनाचा हा आलेख सातत्याने उंचावत गेला आहे. वर्ष २०१६ मध्ये रक्तपेढीने १० हजार २६०, २०१७ मध्ये १० हजार ३५ रक्त पिशव्या संकलित करण्याचा उच्चांक गाठला आहे. .तर २०१८ मध्ये रक्तपेढीने वर्षअखेर १० हजारपेक्षा अधिक रक्त संकलनाचा टप्पा गाठला आहे. २०१८ वर्षअखेर सर्वोपचारच्या रक्तपेढीने सर्वाधिक १२२ रक्तदान शिबिरांसह ११ हजार ०८ रक्त पिशव्या संकलित केल्या आहेत. (शिवाजी भोसले)
वर्ष शिबिरे रक्तदाते रक्तपेटी एकूण.
२०१६ ११५ ३,७८८ ६,४७२ १०,२६०.
२०१७ ९७ ४,०३५ ४,७७३ १०,०३५.
२०१८ १२२ ४७५३ ६,२५५ ११,००८.
रक्त संकलन ही सरकारची नव्हे, तर जनतेची चळवळ बनली आहे. जनतेच्या माध्यमातून हे कार्य सातत्याने पुढे जात आहे. अनेक रक्तदात्यांच्या माध्यमातून रक्त देण्याकरिता सातत्याने धडपड केली जात असून, त्यांच्या सहकार्यानेच हा उच्चांक गाठणे शक्य झाले आहे..
-- डॉ. बाळकृष्ण नामधारी, सहायोगी प्राध्यापक प्रादेशिक रक्तपेढी.

Comments
Post a Comment