चला देऊयात, खाकीच्या सकारात्मकतेला बळ !

वाहतूक नियमांची जनजागृती : सामाजिक जबाबदारी म्हणून पोलीस प्रशासनाचा पुढाकार

अकोला : पोलीस प्रशासन व शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने वाहतूक नियमांची जनजागृती करत नागरिकांचे प्राणात्मक बचावाकरिता सकारात्मक पुढाकार घेतला जात आहे. केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर सामाजिक जबाबदारी म्हणून पोलीस प्रशासनाने एक पाऊल सकारात्मकतेकडे टाकले आहे. त्यांच्या या पावलावर पाऊल टाकत सर्वसामान्य नागरिकांनीही पोलीस प्रशासनाला सहकार्य करून खाकीला बळ देण्याची आवश्यकता आहे.

जिल्हाभरात जानेवारी ते डिसेंबरदरम्यान झालेल्या ३८५ अपघातांमध्ये १३० इसमांचा मृत्यू झाला आहे, तर ७८ इसम गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्रात १ लाख ५५ हजार, तर देशभरात तब्बल ८ लाखांपेक्षा अधिक इसमांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आहे. यासोबतच नगण्य असलेले ब्लॅकस्पॉट तब्बल २२ इतके झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचा अपघातापासून बचाव करण्याकरिता पोलीस दलामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानांतर्गत अपघात प्रवणस्थळ, अतिक्रमित ठिकाणे आदी १११ ठिकाणी आवश्यक सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच पोलिसांकडून प्रबोधनात्मक पथनाट्य, शॉर्ट फिल्म, मीडिया व्हॅन, शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन जनजागृती करण्यात आली. यासोबतच हेल्मेट वापरण्याकरिता हेल्मेट रॅली, पोस्टर, बॅनर, सूचना फलके वाटप करून नागरिकांची मानसिकता बदल्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना अपघातापासून बचाव करता यावा, याकरिता सामाजिक जाणिवेतून सकारात्मक पाऊल टाकले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाला हातभार लावत खाकीला बळ देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

अपघात शून्य जिल्हाकडे वाटचाल

जिल्हाभरात होत असलेल्या अपघातांना रोखता यावे, याकरिता जिल्हाभरातील अपघात प्रवण आणि अतिक्रमीत ठिकाणी सूचना फलके लावण्यात आली आहेत. नागरिकांना सहजतेने वाचता येतील आणि त्यांना दिशा देतील, अशी सूचना फलके लावल्याने वाहनचालकांना वाहन चालविणे सोयीयुक्त होत आहे. त्यामुळे अपघाताची तुलना केली असता रस्ता सुरक्षा मोहिमेतून अपघात शून्य जिल्ह्याकडे वाटचाल सुरू आहे.

हेल्मेट जनजागृतीवर भर

शहरासह जिल्हाभरात हेल्मेट वापराकरिता जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सकारात्मक पावले टाकली जात आहेत. नागरिकांनी स्वसंरक्षणासाठी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. याकरिता जागृतीपर कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात आले असून, त्याअनुषंगाने शहरातून मोटारसायकल रॅलीही काढण्यात आली आहे.


"रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी राबवित असलेले विविध उपक्रम उपयुक्त ठरत आहेत. पोलिसांनी केलेल्या उपक्रम, जागृती, कार्यक्रमातून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे शक्य होत आहे."- एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक, अकोला

 पुण्यनगरी विशेष : शिवाजी भोसले

Comments