एटीएम हॉटलिस्ट सुरक्षित व्यवहारासाठी ठरतेय उपयुक्त !

अकोला : सायबर क्राईमध्ये वाढ होत असल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जुने एटीएम कार्ड बंद करून नवीन डेबिट कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे. एटीएम हॉटलिस्ट सुरक्षित व्यवहारासाठी उपयुक्त ठरत असून त्याअनुषंगाने बँकांनी मॅस्ट्रो कार्ड बंद केले असून, व्हिजा, मास्टर कार्ड, युरोपे कार्ड लवकरच बंद होणार आहेत.

अनेक बँकांच्या खात्यांमधून खातेदारांचे पैसे ऑनलाइन पद्धतीने खात्यातून चोरीला गेल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांना मिळाल्या आहेत. या प्रकारांना आळा बसावा, याकरिता आरबीआयच्या निर्देशानुसार सर्व बँकांनी ३१ डिसेंबरपर्यंत जुने एटीएम डेबिट कार्ड बंद करून खातेदारांना मास्टर चिप लावलेले नवीन डेबिट कार्ड देण्यात येत आहे. खातेदारांनी त्यासंदर्भात बँकेत केलेल्या अर्जानुसार त्यांना हातोहात तर अनेकांना घरपोच हे डेबिट कार्ड मिळत आहे. ज्या बँक खातेदारांना नवीन डेबिट कार्ड मिळाल्यानंतर ते ॲक्टिव्हेट करण्यात आले. मात्र बँकेतून पैसे काढण्याकरिता गेले असता हॉटलिस्टेट झाल्याची स्लिप निघत आहे. तसेच एटीएममध्ये एरर, तांत्रिक अडचणी नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.

मास्टर चिप डेबिट कार्ड अधिक सुरक्षित

अलीकडे ऑनलाइन सायबर क्राइममध्ये गुन्हे वाढलेले आहेत. या प्रकरणांना आळा बसावा, याकरिता बँकेकडून सुरक्षितता बाळगण्यात येत आहे. त्या दृष्टिकोनातून नवीन डेबिट कार्डमध्ये मास्टर चिप बसविण्यात आली आहे. त्यामुळे चुकीचा पासवर्ड टाकण्याचा प्रयत्न केला किंवा एटीएम कार्डसोबत छेडखानी करण्याचा प्रयत्न केला, तर खातेदारांना व बँकेला मॅसेजद्वारे त्वरित माहिती पडते. तसेच कुठल्याही एटीएमवरून ऑनलाइन व्यवहार, खरेदी करावयाची असल्यास प्रथम ओटीपी येतो. त्यामुळे अधिक सुरक्षित व्यवहार करणे शक्य झाले आहे.

अधिकृत मॅसेजकडे अनेकांचे दुर्लक्ष

विविध बँकेच्या खातेदारांना बॅंकेतून अधिकृतरीत्या मास्टर चिप डेबिट कार्ड देण्याकरिता मॅसेज येत आहेत. मात्र याकडे अनेक खातेदार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तर अनेक खातेदार सुरक्षिततेच्या कारणाने प्रत्यक्ष बँकेत जाऊन डेबिट कार्डची चौकशी करून कार्ड बदलून घेत आहे. तर अनेक खातेदार केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.

बँक कुठलीही माहिती मागत नाही

बँकेमध्ये खाते असलेल्या कुठल्याही खातेदारांना बँक कुठल्याही स्वरूपाची माहिती मागत नाही. यासंदर्भात कुठलाही कॉल आल्यास नागरिकांनी प्रतिसाद न देता माहिती देणे टाळावे. तसेच कुठल्याही आर्थिक, बॅंकिंग, ऑनलाइन व्यवहारात कार्ड, बँक, व्यक्तिगत माहिती मागितल्यास पोलिसांशी संपर्क साधून तक्रार करावी.


" नागरिकांनी सुरक्षित व्यवहारासाठी एटीएम व्यवहार करताना क्लोरिंग करणे आवश्यक आहे. यासोबतच आपले एटीएम कार्ड बिल पे करताना किंवा कुठल्याही स्वरूपाची माहिती मागितली असता ती देऊ नये."
-- दिलीपकुमार उपासनी, मुख्य प्रबंधक, एसबीआय 

Comments