वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे होणार समुपदेशन

पुण्यनगरी विशेष : शिवाजी भोसले

अकोला : वाहनधारकांची सुरक्षितता हेच ब्रिद घेऊन त्यांच्या जीवितांच्या सुरक्षिततेसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने सकारात्मक पाऊल टाकण्यात येत आहे. वाहतुकीच्या नियमांना अधिक प्राधान्य देत त्यांना जपण्याकरिता वाहनचालकांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याने वाहतूक विभागामार्फत राबविण्यात येणारा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.

राज्याच्या परिवहन आयुक्तांनी वाहनांची तपासणीचा आदेश दिल्यानंतर आरटीओ कार्यालयाने वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आठवड्यातून दोन दिवस कारवाईची मोहीमही राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत वाहनांची तपासणी करण्याकरिता आरटीओमार्फत पथकही नेमण्यात आले आहे. त्यानुसार शहरात वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये लायसन्स मुदत समाप्त, इन्शुरन्स सर्टिफिकेट, विना हेल्मेट, नियमबाह्य नंबर प्लेट, सीटबेल्ट, प्रखर दिवे बसवणे, कर्णकर्कश हॉर्न, दुचाकीवर दोन पेक्षा जास्त प्रवासी, चोरटी प्रवासी वाहतूक, बेशिस्त वाहन चालविणे अशा वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांना दंडाचीही आकारणी करण्यात येणार आहे. दंडाची रक्कम भरल्यानंतर वाहनधारकांचे समुपदेशन करून वाहने सोडण्यात येणार आहेत. यामध्ये त्यांनी सीटबेल्ट, हेल्मेट का वापरले जात नाही? वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याची कारणे जाणून घेतली जाणार आहेत. त्याअनुषंगाने नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीवसुद्धा करून देण्यात येणार आहे.

-- समुपदेशनाकरिता त्रिसदस्यीय समिती
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्याकरिता आलेल्या वाहनधारकांचे समुपदेशन करण्याकरिता त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह सहायक निरीक्षक, सहायक परीवहन अधिकारी यांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून आठवड्यातून दोन दिवस समुपदेशनाचे कार्य चालणार आहे.


" नागरिकांकडून होत असलेल्या वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळता यावे, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांचे समुपदेशन करून मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे."
-- विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Comments