काय यालाच प्रेम म्हणायचं ?

प्रेम खरं तर विचारांना बाहेरच विश्व!   प्रेमाची निस्सिमता अजूनही कुणालाचं जाणता आली नाही. प्रेमाची असणारी एकसंघ चाकोरी कुणाच्या कल्पनेत मांडता आधीच नाही. म्हणजे प्रेम असतं तरी काय?  हे अजूनही कुणाचं समजलं नाही. प्रत्येक जण प्रेमाच्या अवतीभवती रेंगाळत असतो, पण प्रेम असतं तरी काय? हेच स्पष्ट सांगता येत नाही. आणि मांडता येत नाही. त्याच्या सभोवताली मात्र  जाता येतं.

'माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे' असं प्रत्येक तरुण-तरुणी आपल्या प्रियकर प्रेयसीला सांगत असेल, मात्र त्यांना प्रेम नेमकं काय आहे, याची  कल्पना सुद्धा आलेली नसावी. आज जिथं जावं तिथं तरूण तरूणींचे घोळके दिसतात. त्यात बरेच तरूण तरूणी हे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत असतात. पुढे ओळखीचे रूपांतर मैत्रीत होतं... नंतर प्रेमात... हे चक्र प्रत्येक तरुण-तरुणीशी जोडलं जातं असावं. यामधून कुणीच सोडलेलं नसतं. परिणामी असणारा त्यांचा समुह हळूहळू कमी व्हायला लागतो. कारण कुणाचं ना कुणाचं, कुणासोबत तरीसुद्धा जुळलं जातं. जुळविलं जात. प्रथम प्रचंड मोठा दिसणारा समुह आता दिवसेंदिवस कमी होतो. त्यामध्ये कित्येकांना हे सर्व पटत सुद्धा नसतं. परंतु मित्र-मैत्रिणी टिकवण्यासाठी त्यांनाही यामध्ये सहभागी व्हावं लागतं. हे हि तितकच सत्य... त्यात कदाचित त्यांचा नाईलाज असावा. यात कित्येकांचं नुकसानही होतं.

कधीकधी आपणास आवडणारी मुलगी ही इतरांनाही आवडायला लागते. कधी एखाद्या मुलीच्या मनात असणाऱ्या मुलांची संख्या कमी कधीच नसते. आपल्या समुहात असणाऱ्या अनेक मुलांशी तिचं मैत्रीचं नात असावं. प्रत्येकाचं वागणं.. बोलणं.. राहणं.. हे तिच्या नजरेत भरतं. आपल्या हसण्यानं 'ती' कित्येकांच्या काळजावर वार करते. त्यामुळे कित्येक मुलं घायाळ होत असावीत. यातूनचं तिच्या प्रत्येक कलेवर प्रेम व्हायला लागतं. तिचं बोलणं हे माधुर्यासारखं वाटायला लागतं. तिचा प्रत्येक शब्द हा मोत्यासारखा तोलून धरतात. आणि हे सर्व प्रत्येकाच्या नजरा चुकून घडत असतं. कित्येकांना असं वाटतं की, 'ती' माझ्या प्रेमातचं पडली असावी. परंतु वास्तविकतेचं स्वरूप काही वेगळीचं असतं.

प्रत्येक युवक युवतीच्या बाबतीत असंच घडतं. मग ती तरुणी ज्या तरूणाकडे एखादी महागडी दुचाकी, चारचाकी... एखाद्या नामांकित कंपनीचा हातामध्ये न बसणारा मोबाईल... अंगात दर्जेदार आधुनिक पद्धतीचा पोशाख... त्यावर इम्पोर्टेड परफ्युम... केसांची नवनवी पद्धत... गळ्यात सोन्याची साखळी आणि बोटांमध्ये सोन्या-चांदीच्या एक दोन अंगठ्या...पायामध्ये स्टायलिश पादत्राणे आणि खिशात असणारी पैशांची खणखणाट... इतकं किंवा त्यापेक्षा  अधिक ज्या तरूणाकडं असतं. त्या तरूणाकडं अधिक तरूणी आकर्षित होतात. त्यावर ती मेहरबान हाते. आणि इतरांचा जीव तीळ तीळ तुटत जातो. हे सत्य मनाला बोचणार असलं तरी ते नाकारता न येणारं आहे.

कदाचित मुलींनाही हे सर्व काही हवं असावं, परंतु त्यांचही जाहीरपणे प्रगटीकरण कुणाकडे केलेलं नसावं. याला कित्येकांचं अपवादात्मक स्वरूपही आहे. त्याबद्दल माझं बोलणं, लिहणं कदाचितच नाही. वरील सर्व गोष्टी सहज मिळाल्या की 'त्या' तरुणीचा 'त्या' तरूणावर प्रेम होतं असावं. खरं की खोटं? हे त्या तरुणीनं  स्वत:चं विचारावं. स्वत:चं आत्मचिंतन करावं. प्रेमात दिसण्यापेक्षा  असणं महत्वाचं असतं.


कालांतराने त्या तरुणाच्या गाडीवर अंगासअंग  लपेटून, चेहऱ्यावर स्कार्पचा वापर करून महागड्या हॉटेल्स रेस्टॉरंट मध्ये जाणं. शहरातील मोठ्या पार्क, बगिच्यात फिरणं. तिथेचं नको असलेलं कृत्य करणं. मोबाईलमध्ये रिचार्ज मारणं. हे सर्रासपणे चालतं. काय यालाच प्रेम म्हणायचं? खरंतर याला प्रेम केव्हाचं म्हणता येणारं नाही. याला केवळ आकर्षण, शरीरसुखाचं लोभणं म्हणतां येवू शकतं. एकंदरीत आजच्या चंगळवादी प्रेमाचं स्वरूप हे 'नाम इश्क का और चाहत जिस्म की' असचं म्हणावं लागेल.

प्रेमाचं सार्वांगिण, व्यापक व चौहांगणानं विचार केला तर  प्रेमाला समाजात जागाच उरली नाही. दिवसेंदिवस तरूण तरूणी  हे आकर्षणाला बळी पडताहेत. आकर्षणचं म्हणजेच प्रेम नसतं. तर...
           'समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते
            मी पण अवघे किंमत भारी, प्रेम मागते
            आनंदाचे देणेघेणे करते नगदी
           आठवणीची किती उधारी, प्रेम मागते' हे गझलकार डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचे शब्द अत्यंत सार्थकी ठरतात.  समर्पणातचं प्रेम असतं, आपलं सुख इतरांच्या ओठात दडायला हवं. निस्सीम त्यागाची, सुख-दु:खाची समर्पणाची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत सच्चा प्रेमी निर्माण होणं अशक्य आहे.

प्रेमाला जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग, वय याचं कुठलचं बंधन नसतं. ते केव्हा हृदयातून बाहेर पडतं, याची शाश्वती देता येणं कठीणचं. कुठल्याही क्षणी, कुणावरही प्रेम व्हावं आणि कसंही व्हावं. त्याच्या, तिच्या गुणदोषांसह स्वीकारणं म्हणजेच निस्सीम, त्यागाचं प्रेम... पण ही भावना उरलीचं कुठं?...

मौज, मजा, मस्ती, चंगळवाद यानं प्रेमाची पुरती वाट लावलीयं. मग पैशावर.. वैभवावर.. सौंदर्यावर.. आजचं प्रेम असतं. आवडीनिवडी जपणं.. महागडी गिफ्ट भेट देणं.. चैनीच्या वस्तू उपभोगणं.. काय यालाच प्रेम म्हणायचं? आणि हे सर्व चौफेर सुरू असतांना खरं प्रेमही अनेकांकडून नाकारलं जातं. प्रत्येकचं प्रेम हे आकर्षण.. पैशावर.. सौंदर्यावर.. वैभवावर नसतं. काहींच प्रेम हे मनावर असतं. ते ओळखाही येणं आवश्यक आहे. खऱ्या प्रेमासाठी निस्सीत देहांत झोकून सुख-दु:खात वाटून घ्यायचं. की उनाड वागणाऱ्या  युवक युवतीच्या  दिखाव्याला बळी पडून प्रेम करायचं. हे आपणचं ठरवायचं असतं.

🌀 शिवाजी भोसले
+919689964143

Comments