जगण्याचा सार 'तू गुंतला असा की'...

      'तू गुंतला असा की..." हा निर्मला सोनी यांच्या ८६ नावीन्यपूर्ण गझलांचा गझलसंग्रह प्रकाशित झाला. अमरावती येथील पायगुण प्रकाशनाने अत्यंत सुबक मांडणी करून या गझलसंग्रहाचे प्रकाशन केले. दु:ख, विरह, वेदना हे असतेच. पण या पलिकडचे जगणेही असते हे कवियित्रीने अधिक उत्तमपणे रेखाटले आहे.
     मानवी जीवनात अनेक चढ- उतार येत असतात. या चढ- उतारास अनेकांनी आपलसे केले, तर कित्येकांनी त्यावर मात करीत जीवनाची यशस्वी पताका फडकावित ठेवली. आलेल्या संकटांना, दु:खांना, वेदनांना कुरवाळत बसण्यापेक्षा त्यावर निर्भीडपणे स्वार होणाऱ्यालाच जग आपलसे करते, हे शाश्वत सत्य केव्हाही नाकारता येणार नाही. हेच जगणे गझलकार 'निर्मला सोनी' यांनी 'तू गुंतला असा की' या आपल्या पहिल्या वहिल्या गझलसंग्रहातून साकार केले आहे.
        माणसांचे जगणे किती सुखद असते, हे प्रत्येकास माहिती आहे. पण त्यापासून अलिप्त राहून प्रत्येकाचे वागणे, बोलणे, दु:खालाच चिकटलेले असते.
वास्तव जगणे रेखाटतांना कवयित्री आपल्या पहिल्याच गझलेत मांडते की,

      "आयुष्याला गीत म्हणाले, चुकले कोठे ...?
       या जगण्याला प्रीत म्हणाले, चुकले कोठे ...?
       कैक जगाला का जगण्याचा समजत नाही
       मृत्यूला मी जीत म्हणाले, चुकले कोठे ...? "

      आयुष्याचा प्रत्येक क्षण हा आनंदाने द्विगुणित करावा. आयुष्यात कुठलाही क्षण हा नैराश्याचा, भीतीचा, संकटांचा नसतोच. मात्र माणसाचे मन हे त्या पद्धतीने वागते. सातत्याने चिंताग्रस्त जगणे हे दु:खाला निमंत्रित करते. जगाला कसे जगावे हे कळते पण वळत नाही. हा प्रत्येकांचा नित्याच्या अनुभव आहे. मात्र आयुष्याला एखाद्या गीताप्रमाणे गुणगुणण्याची भाषा ही मूठभर लोकांनाच जमते.
     आव्हान, संकट, कितीही आली तरी हार मानू नये. त्यावर ही मात करता येवू शकते. जीवनाचा आत्मविश्वास किती दृढ असावा, याबाबत मत मांडताना त्या लिहतात,

      "विश्वास मला या जगण्यावर इतका होता
       आव्हानांनी ठोकरले पण हरले नाही "

     जीवन जगतांना अनेक यातनांचा कल्लोळ सोसाव्या लागतो. कष्ट निपजवावे लागतं. स्वतःच्याच धुंदीत जगावे लागते. पण हा समाज, ही व्यवस्था इथल्या चालीरीती, रुढी, परंपरा कुठे कुणास सुखाने नांदू देते ? जो सत्याचा मार्ग अंगिकारतो, सत्याच्या मार्गाने मार्गक्रमण करतो अशांना दुनिया जगू देत नाही हा आजवरचा इतिहास आहे. माणसे मारल्याने विचार मरत नाही हे शाश्वत सत्य आहे. उलट, त्या विचारांचे, माणसाचे, सत्याचे बळ वाढीस लागते. त्यांचे विचार आत्मसात व्हायला लागतात. त्यांचे जगणे मृत्यूलाही घाबरून सोडणार असते. याबाबत त्या आपल्या शेरात लिहतात,

   "या जगी इतिहास रचला चढविले त्यांना सुळावर,
     हाल केले खूप त्यांचे मग कुठे सत्कार झाले "

हे त्यांनी परखडपणे रेखाटले आहे. जीवनी आलेल्या दुःखाला न घाबरता त्यांनी संकटालाच कसे आव्हान दिले आहे हे त्यांच्या या शेरावरुन लक्षात येईल.

        "झुकणे कबूल नाही मरणे कबूल आहे
         हातून जीवनाच्या लुटणे कबूल आहे "

यातून त्यांनी स्वाभिमानाचे प्रतिक उत्तमपणे मांडले आहे. जीवनाची लढाई ही शेवटच्या श्वासापर्यंत लढावीच लागते. त्यापासून पळता येणार नाही.
जीवनाचे चित्र रेखाटतांना ज्या गझलेने कवियत्रीला संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले ती गझल मानव प्राणीमात्रांना वेगळाच संदेश देवून जाते.
      " तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही,
        अन सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही
         आयुष्य युद्ध आहे जिंकून एकदा घे
        सांगू नको पुन्हा की लढण्यास वेळ नाही "

         साध्या कवितेपासून सुरू झालेला हा गझलेचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. गझलेची त्यांची शैली स्व:ता निश्चितच बळकट करणारी ठरते. सोबतच मानवी वृत्तीला चिंतनही करायला लावते. त्यामुळे गझलकार निर्मला सोनी यांनी जगण्याचे सार, वास्तव, दु:ख आपल्या कसदार लेखणीतून सातत्याने मांडत जावे हीच इच्छा ! त्यांचे लेखन-कला कृतीसह अभिनंदन व पुढील साहित्य वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा !!
        
                                - शिवाजी भोसले
                                  मो. नं. 9689964143

गझलकार : निर्मला सोनी
गझलसंग्रह : तू गुंतला असा की
प्रकाशक : पायगुण प्रकाशन, अमरावती
पृष्ठ : ९६,  मूल्य : १२५/- रुपये

Comments