नेत्रदानासाठी पुढाकाराची आवश्यकता

भारतासह जगभरातल्या असंख्य देशांमध्ये गरिबीमुळे पोषण आहार न मिळाल्याने, अपघात, विविध आजार अशा विविध कारणांमुळे अनेकांना अंधत्व येते. अकाली अंधत्व आलेल्या लोकांवर ऑपरेशन करून नवीन दृष्टिपटल बसवून दृष्टी परत दिल्या जाऊ शकते. परतु, असे ऑपरेशन करण्यासाठी आवश्यकता आहे ती (दृष्टिदान) नेत्रदानाची. त्यामुळे नेत्रदानाचे महत्त्व समजून जगभरात १० जून हा दिवस ’जागतिक नेत्रदान दिन' म्हणून साजरा केल्या जातो.

डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे. दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग बघता येत नाही, पण या महत्त्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही. आज फोन, इंटरनेट यामुळे जग खूप जवळ आले असले तरी त्याच्या आहारी जाऊन डोळ्यावर ताण येऊन जगात डोळ्याचे त्रास वाढून अंध लोकांची संख्या खूप वाढत आहे. त्यामुळे शक्य असेल तर प्रत्येक लोकांनी मृत्यूनंतर नेत्रदान केले पाहिजे, कारण मृत्यूनंतर नेत्रदान कोणाला तरी उपयोगी पडून त्याचे अंधत्व दूर होऊ शकेल.

भारतामध्ये असलेल्या कायद्यानुसार, नेत्रदान हे मरणोत्तर करावे असे असले तरी, वयाचे एक वर्ष पूर्ण केलेला कोणताही व्यक्ती हा नेत्रदान करू शकतो. हे नेत्रदान मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, उच्च मानसिक त्रास आणि चष्मा वापरत असणारे व्यक्तीही करू शकतात. आपल्या मृत्युपत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त करून आणि त्याविषयी जवळच्या नातेवाइकांना कल्पना देऊन मृत व्यक्तीचे डोळे पुढे कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतात.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या मृतदेहाची जबाबदारी ही त्या व्यक्तीच्या वारसदाराची असते. मृत व्यक्तीच्या नेत्रदानासाठी त्याच्या वारसदाराची परवानगी घेणे आवश्यक असते. वारसदाराने परवानगी नाही दिली तर नेत्रदान होऊ शकत नाही. तसे मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली नसली तरी वारसदाराच्या इच्छेने नेत्रदान केल्या जाऊ शकते. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने किमान दोन जणांना असंख्य रंगांनी बहरलेले नयनरम्य जग बघता येऊ शकते.

आजही समाजातील लोकांमध्ये नेत्रदानाविषयी जागरूकता निर्माण झालेली नाही. कारण आजही लोक जुन्या विचारसरणीवर विश्वास ठेवतात. नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन मरणोत्तर नेत्रदान प्रत्येकाने केले पाहिजे. यामुळे अंध व्यक्तींना दृष्टी देण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण काम आपल्या हातून घडू शकते. आपल्या नेत्रदानाने देशातील अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. चला तर मग, निसर्गाची अद्भुत किमया अंधांनाही पाहता यावी यासाठी देण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण काम आपल्या हातून घडू शकते.


 आपल्या नेत्रदानाने देशातील अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. चला तर मग, निसर्गाची अद्भुत किमया अंधांनाही पाहता यावी यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान करण्यासाठी आजच कायदेशीर कार्यवाही करू या.

                                       -- शिवाजी भोसले 
                                           मो 9689964143

Comments