आंबेडकर भवन आणि सुशिक्षितांची बेईमानी
-------------------------------
आजच्या पुण्यनगरीमधे 'प्रवाह' पुरवणीत सुप्रसिध्द स्तंभलेखिका व संपादिका मा.राही भिडे यांचा 'बाबांची लेकरे सैरावैरा' हा चळवळीतील कार्यकर्त्यांना विचार करायला लावणारा गंभीर स्वरूपाचा लेख आहे.त्यामधे एक वाक्य आहे," केवळ आयएएस असून चालत नाही.समाजात झोकून देऊन काम करावे लागते.झोपड्यांतून,गावखेड्यातून आलेल्या गोरगरीबांना भेटावे लागते,त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या लागतात,त्यांना मदत करावी लागते,झोपड्या वाचवाव्या लागतात,त्यांना जमिनीचे पट्टे द्यावे लागतात,इतरांनी बळकावलेल्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी आंदोलने करावी लागतात,वसतिगृहात प्रवेश द्यावा लागतो,शिक्षण,नोकरीधंद्यासाठी आलेल्या मुलांची राहण्याची सोय करावी लागते,हे बाळकडू बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना दिले आहे."
बाबासाहेबांच्या पुण्याईने उच्च पदावर पोहचलेल्या प्रत्येक अधिका-याने जर ही गोष्ट लक्षात घेतली असती तर आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र असलेले आंबेडकर भवन रात्रीच्या अंधारात चोरून पाडल्याच गेले नसते आणि बाबासाहेबांच्या करोडो अनुयायांचा रोष ओढवून घेतला नसता.मुळात डाॅ. आंबेडकरांचे नाव घेऊन काम करणा-या मोठे नेते व अधिकारी यांना बाबासाहेब समजलेच नाही.त्यांनी बाबासाहेबांना फक्त स्वतःच्या स्वार्थाकरीता वापरून घेतले.शिकलेल्या लोकांनी समाजातल्या गोरगरीबांना आपल्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच खरे शिक्षण होय हे बाबासाहेब नेहमी सांगायचे.पण नंतर 'शिकलेल्या लोकांनीच मला फसविले आहे' असे ते उद्वेगाने म्हणाले होते.आणि आज तर त्यांचे वाक्य २०० टक्के खरे झाले आहे असे खेदाने म्हणावे लागते.बाबासाहेबांची चळवळ जीवंत आहे ती फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर आणि श्रध्देवर.म्हणूनच जेव्हा जेव्हा बाबासाहेबांच्या नावाला धक्का पोहचतो,तेव्हा सामान्य माणूसच रस्त्यावर उतरतो.नेते मात्र त्या घटनेचे राजकारण करून आपला फायदा कसा होईल याचाच सदैव प्रयत्न करीत असतात.आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन काही अधिका-यांनी रातोरात आंबेडकर भवन जमिनदोस्त केले.आताही खरा आक्रोश जनतेमधूनच आहे.
बाबासाहेबांच्या पक्षाचे नेत्यांनी एवढे तुकडे केले की कोण कोणत्या गटाचा नेता आहे हेही समजत नाही.म्हणूनच रामदास आठवलेंसारख्या मोठ्या नेत्यालाही सत्तेसाठी इकडून तिकडे फिरावे लागते तरी साधे मंत्रीपदही मिळू शकत नाही.बाबासाहेबांनी मंत्रीपदाला लाथ मारली .पण आजचे मंत्री पक्षप्रमुखाने लाथ मारली तरी मंत्रीपद सोडायला तयार नाही.एवढी लाचारी पत्करल्यावर मग सामान्य जनतेच्या मनात तुमच्याविषयी आपुलकी राहूच शकत नाही.त्यामुळेच कोणताही पक्षसुध्दा तुम्हाला गांभिर्याने घेत नाही.तेव्हा आंबेडकरी चळवळीला जर पुन्हा जुने दिवस आणायचे असतील तर जनतेनेच या नेत्यांवर दबाव आणावा.आणि नेते ऐकत नसतील तर त्यांच्या स्वार्थाकरीता आपला वापर अजिबात होवू देवू नये.तरच 'ही' मंडळी जाग्यावर येतील.नाहीतर 'हे' लोक चळवळ विकायलाही मागेपुढे पाहणार नाही.
-----------------------------
प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी.जि.अम.
Comments
Post a Comment