मराठा क्रांती मोर्चा: परिवर्तनाची नांदी

              सध्या संपुर्ण महाराष्ट्रभर एका चर्चेस उधाण आलेलं आहे. ते म्हणजे कोपर्डी हत्याकांडाच्या निषेधार्थ निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचं ! खरतरं या लाखोंच्या विराट मोर्चाचे नेतृत्व हे कुठल्याही प्रतिष्टित, प्रस्थापित किंवा समाजाचं नेतृत्व करावं अशा पुढारी व्यक्तिकडे नाही. तरीही या मोर्चातिल शिस्त, सभ्यता, एकजुटपणा, एकत्रीकरण, नियोजन याचं कौतुक करावं तेवढ कमीचं ! उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड, जळगाव, परभणी या जिल्हातुन निघालेले सर्वच मोर्चे एकमेकांच्या गर्दीचा उच्चांक गाठणारे होते. या मोर्चानी आता संपुर्ण महाराष्ट्रभर 'मराठा क्रांती मोर्चा'ची अखंडपणे मालिकाच सुरु केली आहे.
           अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातुर, अमरावती, सोलापुर, सातारा, कोल्हापुर, पुणे अशा विविध जिल्हामधिल 'मराठा क्रांती मोर्चा'च्या दिनांक निश्चित झालेल्या असुन नियोजन प्रक्रियेला अत्यंत वेग आलेला आहे. नुसतं प्राथमिक बैठकिच विचारात घेतलं तर या सर्व बैठकिस दहा हजाराच्या जवळपास असणारी उपस्थिती शासणास नक्किच विचार करण्यास प्रवृत्त करत आहे. दिवसेंदिवस या संख्येत वाढ होत असुन प्रत्येक जिल्हातुन निघणारा मोर्चा मनात धडकी भरविणारा आहे.
            मराठा क्रांती मोर्चाचं शिस्तबद्ध नियोजन, कुठेही गोंधळ नाही. जाळ्पोळ नाही. पोलिसानी अश्रूधुरांचे नळकांडे फोडले नाहीत. घोषणाबाजी नाही. कुणासही मानपान नाही. यावरुन एक लक्षात येतं कि, या संपुर्ण मोर्चाची प्रेरणा ही स्वउत्सपुर्तपणे निर्माण झालेली आहे. मराठा समाज एक होत नाही. असं वर्षानुवर्षे एकलं होतं परतु मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून हे स्पेशल खोट ठरलेलं आहे.
            'मराठा क्रांती मोर्चा' लाखोंच्या संख्येत निघणं यास कोपर्डीची घटनाच मुळ आहे असं वाटत नाही. त्यास बरीच कारण आहेत. त्यांचाही शोध घेणं गरजेचं ठरतं. कित्येक वर्षे मराठा समाजावर अन्याय होत होता. मराठा समाज हा धनिक वाटत असला तरी वस्तुस्थिती तशी नाही. इतर समाजाचा मराठा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेग-वेगळ्या पद्धतीचा आहे. मराठा समाजातही इतर समाजाप्रमाणे वाढती बेरोजगारी, नोक-याचे कमी होत चाललेलं प्रमाण, शेतीतिल सततची होत चाललेली नापिकी, उच्चवर्णिय समाजाकडुन होत चाललेली हेटाळणी हेही यामागचं कारण असु शकतं. त्यामुळे मराठा समाजात आपल्यावर अन्याय होतोच, हि भावना निर्माण व्हायला वेळ लागली नाही.
            एकेकाळी शे-दिडशे एक्कर शेतजमिन बाळगणारा मराठा समाज सरकारी 'सिलिंग' धोरणाने देशोधडिला लागला आहे. पुर्वी अठरा पगड जातीला पोसणारा मराठा समाज स्वताचं कुटुंब पोसता यावं येवढाही सक्षम नाही. (काही अपवाद असतिलही) शेती पिकत नाही. शेतमालास योग्य भाव नाही. शिक्षणात आरक्षण नाही. मुलांच शिक्षण व्हावं एवढा पैसा जवळ नाही.यामुळे आलेलं आर्थिक संकट न पेलता येणारं आहे. याचाच उद्रेक झाला असावा मात्र कोपर्डी घटना हे एक निमित्य असावं.
           कोपर्डी येथे घडलेलं प्रकरण हे मानवतेला काळिमा फासणार आहे. एका निरागस कोवळया 9 वर्षाच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडुन तिच्या गुप्तांगामध्ये काच टाकुन तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करणं हे मानवाला, मानवतेला आणी माणुसकिला नक्किच शोभा देणार नाही. अशा राक्षसी नराधमांना काय म्हणाव? हेच कळत नाही. खुनी, बलात्कारी, गुन्हेगार , देशद्रोही, आतंकवादी याना कुठलीही जात, धर्म नसतो. ते कुठल्याही जातित, धर्मात असतात. त्यांना फाशीची शिक्षा देणचं योग्य ठरतं. फाशीपेक्षा कुठली मोठी शिक्षा असेल तर ती त्यांच्यासाठी कमीच आहे.
            मराठा समाजाच्या नव्हे तर इतर कुठल्याही समाजाच्या, धर्माचा  स्त्रीवर असा प्रकार घडू नये. स्त्रीयांना सन्मानाने जगता यावं. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्यांनाही पुरुषांप्रमाणे जगता यावं. त्यांच सक्षमीकरण व्हावं. त्यांचे येणार भविष्य अधिक उज्वल व्हावं आणी अशी घटना पुन्हा घडू नये. याकरीता या मोर्चाचे नियोजन केलं जात आहे. कुणबी, पाटिल, तिरळे, लेवा, लख्खनी, घाटावरचे, घाटाखालचे हे सर्व विसरुन तुम्ही कुठल्या पक्षाचे कोणते पदाधिकारी आहात यातिल सर्व मतभेद विसरुन या मराठा क्रांती मोर्चाला पाठबळ मिळत आहे.
              'मराठा क्रांती मोर्चा' हा कुठल्याही समाजाच्या, जातीच्या विरोधात नाही हे आपण सर्वप्रथम समजुण घ्यावं. इतर समाजानीही तसे गैरसमज करणं हेही अत्यंत चुकिचं आहे. हा मोर्चा केवळ आणी केवळ कोपर्डी घटनेचा निषेध म्हणुन मुकपद्धतीने काढण्यात आलेला मोर्चा आहे. यामध्ये आपणास कुठलीही घोषणाबाजी होतांना दिसत नाही. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतिने हे मोर्चे मार्गक्रमण होत आहे. यामघ्ये काही समाज विघातक कृत्य करणारी माणसे जातिय तेढ निर्माण करण्याचा, मोर्चादरम्यान वातावरण दूषित करण्याचा, या मोर्चाला वेगळ वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना फार काही यश लाभत नाही.
             ॲक्टासिटी ॲक्ट रद्द व्हावा, मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक आरक्षण मिळावं अशी कुठल्याही स्वरुपाची मागणी आजवर झालेल्या क्रांती मोर्चादरम्यान झालेली नाही. हं त्यामध्ये ॲक्टासिटी कायद्याच्या आधारे जे राजकारण केलं जातं, त्यांची चुकीची अमंलबजावणी होत आहे.ती तात्काळ थांबवा, अशा प्रकारची मागणी करणं हे काही चुकिच आहे असं मला वाटत नाही. अनुसुचित जाती व अल्पसंख्यांकाना संरक्षण मिळावं या उद्दात्त हेतुने ॲक्टासिटी ॲक्टची निर्मिती करण्यात आली परंतु संरक्षण घेण्याएवजी मुठभर व्यक्तीकडुन त्यांचा दूरपयोग होतांना मोठया प्रमाणावर दिसुन येतं. हा दूरपयोग थांबविणं हे नितांत गरजेचं आहे.
            'मराठा क्रांती मोर्चा' दरम्यान ॲक्टासिटी ॲक्ट संदर्भात विविध व्यक्तीची विविध मतांतरे प्रदर्शित होत आहेत. मराठा-दलित-मुस्लिम वा अन्य समाजात जातिय तेढ निर्माण होवुन एकमेकांनी एकमेकांच्या समाजाविरोधात असेच लाखोंचे शक्तीप्रदर्शन करावं, जातिय दंगली उसळाव्यात हिच यामागची मुळ भुमिका असु शकते. परंतु 'मराठा क्रांती मोर्चा' हा वरील सर्व बाबीस अपवाद आहे. हा मोर्चा प्रत्येक समाजातिल आई, बहिण, मुलगी, स्त्री यांना सरंक्षण मिळावं. त्यांचं अस्तित्व, अस्मिता अबाधित रहावी. येणा-या पिढीला सक्षम करण्यासाठी सकल मराठा समाज एकत्र येत आहे. हे पुन्हा-पुन्हा सांगावं लागतं. ही सर्वच स्त्री वर्गाच्या अस्तित्वाची लढाई आहे. ती सर्वानी लढलीच पाहिजे. फक्त मराठा समाजाने त्यात पुढाकार घेतला आणी पाहता पाहता लाखोंचे मोर्चे प्रत्येक जिल्हात निर्माण झालेत, होत आहेत. त्यात वाईट वाटण्याचं काय कारण.......
             मात्र इथे एक विशेष बाब स्पष्ट कराविसी वाटते कि या मोर्चाने कदाचित सरकारला चांगलीच धडकी भरलेली आहे. असं दिसुन येतं. 'न भुतो, न भविष्यती' असं या मोर्चाचे स्वरुप असल्याने यातुन नक्किच परिवर्तन घडेल. या मोर्चाच्या माध्यमातुन मराठा समाजात नवं क्रांती निर्माण होत आहे. भविष्यात एखांद उमद नेतृत्व यामधुन निर्माण होवू शकतं. हे येणारा काळ नक्किच ठरवेल. ज्यानी आजवर मराठा समाजाचा फक्त राजकारणाकरिता उपयोग केला. त्यानाही चिंतन, मनन करण्याची हीच योग्य वेळ असावी.

                              @ शिवाजी भोसले, अकोला
                                  मो. 96 89 96 41 43

Comments