अकोला शहराच्या दक्षिणेस डोंगर द-याच्या आडोशाला 'पातुर' शहर वसलेलं आहे. तसं या शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अनेक शाही सुलतान, बादशाह यांनी या शहराहून मार्गक्रमण केलं. या शहराला जोडणारा बाळापूर - पातुर महामार्गावर शहराच्या उत्तरेस सुवर्णा 'बोर्डी' नदीच्या तिरावर एक उंच टेकडी आपणास पहावयास मिळते. आणी याचं टेकडीवर 'माता रेणुका माऊलीचं मंदीर' वसलेलं आहे.
तसं या मंदिरास असा कुठलाही ऐतिहासिक असा पुरावा नाही. हे मंदिर केव्हा, कसे निर्माण झालं. हे निश्चितपणे कुणासही सांगता येत नाही. कुठल्याही स्वरुपाची पार्श्वभूमी, अख्यायिका आपणास याबाबत पहावयास मिळत नाही. परंतु परिसरातिल नागरिकांना जवळपास कुठल्याही स्वरुपाचं देवीचं मंदिर दर्शनाकरिता उपलब्ध नव्हते. माहुरचे 'रेणुका देवीचे मंदिर' हे श्रद्धेचे सर्वोचं मंदिर होतं पण तेथे जाण्याकरिता दूर होत होतं. त्यामुळे येथे असलेल्या नागरिकांनी हे मंदिर निर्माण केलेलं आहे. असं सांगण्यात येतं.
पुर्वी अगदी छोटसं मंदीर होतं. तेही अगदी मोडकळीस आलेलं. रेणुका माऊलीचं मंदिर असल्याने नागरिकांची आस्था बळकट होत गेली. टेकडीवर मंदिर असल्याने पंचक्रोशितिल नागरिक भक्तिभावाने दर्शनास येवु लागले. हा प्रवाह दिवसेंदिवस वाढिस लागला. त्यामुळे मंदिराचा जिर्नोद्धार करणं गरजेचं होतं पण देवीचं भव्यदिव्य मंदीर उभारावं असं भक्तानी ठरवलं. आणी पाहता पाहता अनेक दानशुर, देणगीदार समोर आलेतं. आणी त्यांच्या सहाकार्यातुन भव्य असं देखणं मंदीर साकारल्या गेलं.
महामार्गावर उभं राहल्यास गडावर जाण्यास भव्य असं मनविलोभनिय प्रवेशद्वार लागतं. गडावर जाण्याकरिता सिमेंटच्या 240 पाय-या असुन वृद्धांकरिता आधारासाठी लोखंडी रोलिंग लावलेलं आहे. थोड दूर पाय-याने चढत गेल्यास मंदिराचे तत्कालिन पुजारी, व्यवस्थ्यापक 'दिनानाथ महाराज यांची कुटी' व समाधी आपणास दिसू लागते. दिनानाथ महाराज यांनी आपल्या प्रयत्नानी हे मंदिर उदयास आणलं असं विश्वस्ताकडुन कळतं. पुढे अजुन थोडे वर गेल्यावर 'संकटमोचन हनुमान मंदिर' व 'गणेश मंदिर' यांचं दर्शन होतं. या नंतर 'रेणुका माता मंदिरा'चा सपाट भाग लागतो आणी भव्यदिव्य असं मंदिर आपणास पहावयास मिळतं. याचं ठिकाणी 'दत्त अनुसया माते'चे सुद्धा आपणास दर्शन होते. गायत्री, श्रीराम व महादेव आदि मंदिरेही आपणास पहावयास मिळतात
हे मंदिर म्हणजे 'मिनी माहुर' म्हणुन परिसरात ओळखलं जातं. हि टेकडी 'गड' म्हणुन ओळखली जाते. भक्ती उरात साठवुन आलेल्या भाविकांना गड चढताना फारसा त्राण वाटत नाही. देवीचं रुप डोळयात भरणार आहे. येथे आल्यावर भाविक आपला सर्व क्षिण विसरुन जातो. आणी रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होतो. एकुण टेकडीवर असलेलं मंदिराचं दृश्य व वातावरण डोळ्याचं पारणे फेडणार आहे.
या मंदिरामध्ये सकाळी, संध्याकाळी 6 वाजता देवीची आरती केली जाते. या आरतीचे एक वेगळेचं आकर्षण आहे. तसेच दस-याला 'रावण दहन' करण्यात येतं. त्यामुळे जवळपासच्या पंचक्रोशितिल परिसर, खेडे पाडे येथुन येणारा भाविक आपल्या मनातिल भावना श्रद्धेने देवीसमोर व्यक्त करतो. साकडे घालतो. 'नवसाला पावणारी', 'भक्ताच्या हाकेला धावणारी', अशी अनेक भाविकांची धारणा आहे. तसेच दर्शनाकरिता येणा-या भाविकांना देवीच्या कृपेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. असे अनेक अनुभव भाविक कथन करतात. दर मंगळवारी व नवरात्र उत्सवात हा परिसर अगदी गजबजुन गेलेला असतो.
नवरात्र उत्सवात संपुर्ण मंदिरावर आकर्षक रोषणाई असते. मुलांकरिता खेळणी, भक्ताना जेवणाकरिता गोलाकार छत्री, तसेच गडावरुन निसर्गाचे विहंगम दृश्य, तपे हनुमान, राम मंदीर, बोर्डी नदी व पातुर शहराचे दृश्य आपणास सहजतेने डोळ्यात टिपता येते. त्यामुळे 'रेणुका देवी मंदिरा'कडे जिल्ह्यातिल एक पर्यटन स्थळ म्हणुनही पाहिल्या जाते. या ठिकाणी रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी अनेक भाविक, शालेय विध्यार्थी, परिवार दर्शनाकरिता व पर्यटनासाठी येथे येतात. त्यामुळे येथे सदैव उत्साहाचे वातावरण असते.
@ शिवाजी एस. भोसले
मो. 96 89 96 41 43
Comments
Post a Comment