रस्त्यावरची लढाई शेतकरी कायम जिंकतो, पण...!

          शेतकरी कर्जमाफीच्या चर्चेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उधाण आलं. शेती आणि मातीशी असलेलं शेतकयांचं जगणं इथल्या व्यवस्थेनं केव्हाचं लाचार केलं. त्याचं जीवन अस्मानी, सुलतानी संकटांनी केव्हाचंच भरडलं गेलंय, मात्र त्यानं केव्हाच माघार घेतली नाही. माघार घेणं हे शेतकऱ्यांच्या रक्तातच नसतं, मात्र इथल्या मध्यस्थी दलालांचं 'नेतेपण' जागतं आणि शेतकयांचा बळी घेतला जातोय. हे आजवरच्या इतिहासानं दाखवून दिलंय.

          शेतकयांनी सत्तेला कायम घाम फोडलाय, सत्तेला हादरवून सोडलंय हे या आंदोलनाने परत एकदा सिद्ध केलंय. ही फार मोठी उपलब्धी या आंदोलनाची आहे, असं मानण्यास काहीच हरकत नाही. शेतकऱ्यांवर आलेलं निराशेचं मळभ या आंदोलनानं बयापैकी दूर झालंय आणि आपल्याच शक्तीचं गेलेलं विस्मरण 'आत्मभान' या आंदोलनानं शेतकयांना मिळवून दिलंय. मात्र, कुणीतरी सत्तेच्या लोभापायी किंवा इतर कुठल्या कारणानं मध्यस्थी करून शेतकयांचा बळी दिलाय. कायम ’बळी' जाणं हेच शेतकयांच्या पाचविलाच पुजलं आहे.

         सरकारशी हातमिळवणी करून जयाजी सूर्यवंशींनी काय साध्य केलंय त्यांनाच माहिती... कालपर्यंत शेतकयांची बाजू मांडणारे आज सरकारची बांजू मांडताहेत, याचं कुठतरी चिंतन व्हायला हवं. एकूण काय तर ’शेतकरी युद्धात जिंकला आहे, पण शेतकरी नेते तहात पराभूत झाले आहेत' असंच या संपाबाबत वर्णन करता येईल.

          यापूर्वी १९९६च्या दरम्यानची घटना आहे. शेतकरी संघटनेच्या शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण पुकारलं. आंदोलन प्रचंड जोरात सुरू झाले. शेतकरी रस्त्यावर उतरला. आंदोलनास धार प्राप्त झाली. सरकार हादरलं गेलं. परिस्थिती बिघडू नये म्हणून तत्कालीन सरकारने शरद जोशींशी चर्चा करत समिती स्थापन करून तीन महिन्यांत न्याय देण्याचे आश्वासन दिलं. मात्र, याचवेळी वेगळी कुटनीती खेळल्या गेली. सुरुवातीला शरद जोशी माघार घेत नव्हते, पण आपलाच कोणीतरी सरकारला 'मॅनेज' असल्याचा संशय आल्याने त्यांनी उपोषण मागे घेतलं. समिती स्थापन करण्यात आली. आंदोलन मोडीत निघालं, शेतकयांना काहीच मिळालं नाही, पण शेतकयांच्यावतीने 'तेव्हा' बोलणी करणारे शेतकरी संघटनेचे नेते 'पाशा पटेल' मात्र 'नंतर' आमदार झाले. मात्र, आता शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर आता हेच होताना दिसतंय.


          शेतकरी रस्त्यावरची लढाई कायम जिंकतो, पण तहासाठी बसलेले पुढारी त्याला कायम हरवतात. या इतिहासाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आंदोलन शेतकयांनीच ताब्यात घ्यायला हवं. कारण रात्रच नव्हे तर दिवसही वैयाचा आहे. हे सर्वांना कळतं पण वळत मात्र नाही. सध्याच्या घडल्या प्रकरणावर क्रिया प्रतिक्रिया झपाट्याने उमटू लागल्या. अनेकांनी राग, संताप व्यक्त केलाय. पण, लाचार झालेली माणसं 'गद्दारीनं मोठी झालीत, आंदोलनांनी नव्हेत. झाल ते वाईटच झालं. पण, आता शेतकऱ्यांनीच आपल्या पद्धतीने उत्तरं शोधायला हवीत.

                                                --  शिवाजी भोसले
                                                मो. ९९ ८९ ९६ ४१ ४३ 

Comments