वृक्षलागवडीचा ‘फार्स' कशासाठी?

     राज्य शासनाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनासाठी दिलेली गती महत्त्वाची आहे. शतकोटी वृक्षलागवड योजनेंतर्गत विविध ठिकाणी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. हे नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे. मात्र, या वृक्षलागवडीचं नंतर होतं करी काय? किती प्रमाणात संवर्धन आणि संगोपन केलं जातं, हा चिंतनाचा विषय असल्याने वृक्षलागवडीचा हा फार्स कशाकरिता आवळण्यात येतो. याचं उत्तर शोधणं आव्हानात्मक आहे.

     दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याने तापमान वाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चाललेलं आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावांची भौतिक निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. याकरिता वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेलं आहे. यंदाच्या पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लावली जावीत यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच सर्वच घटकांनी वृक्षारोपणाच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.
      एकंदरीत भौगोलिक परिस्थिती पाहता आतापर्यंत वृक्षारोपणामध्ये अडचणी निर्माण होत होत्या, पण सुदैवाने गेल्या काही दिवसात राबविलेला जलसंधारणाचा प्रभावी कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान आणि जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाद्वारे दुष्काळी भागात साठविण्यात येत असलेलं पाणी यामुळे यंदा वृक्षारोपणाला निश्चितपणे गती लाभेल. पावसाअभावी वृक्षारोपणाच्या मोहिमेला मर्यादा आल्या, मात्र काही भागात झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर हाती घेतल्यामुळे बऱ्यापैकी वृक्षारोपणाचे काम होऊ शकतं.

     यंदाच्या पावसाळ्यात वृक्षारोपणाचा भरीव कार्यक्रम हाती घेण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे निर्देशही दिले गेले आहेत. राज्यभरात नर्सरीमधून तयार करण्यात आलेली ४ कोटीहून अधिक वृक्ष लावण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. मात्र, या वृक्षलागवडीचं  एवढं अवडंबर का माजविण्यात येतं, हेच कळत नाही. वृक्षांची लागवड फक्त फोटोसेशन करण्यापुरतं केलं जात आहे. त्यानंतर त्या वृक्षाकडे काळजीपूर्वक लक्ष देणारी माणसे बोटावर मोजण्याइतकीच आहेत. कोट्यवधींच्या जाहिराती करून हा खर्चाचा अपव्यय करण्यापेक्षा त्याआधारेच जर वृक्ष जतन, संवर्धन व वाढीसाठी प्राधान्य दिलं गेलं तर ते सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र, तसं होताना दिसत नाही.


     वृक्ष हा खर्चाचा अपव्यय करण्यापेक्षा त्याआधारेच जर वृक्ष जतन, संवर्धन व वाढीसाठी प्राधान्य दिलं गेलं तर ते सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे. मात्र, तसं होताना दिसत नाही.वृक्षांचं जतन, संवर्धन होणं हे काळानुरूप गरजेचंच आहे. मात्र, याकडे वृक्षप्रेमी, निसर्गप्रेमी, अभ्यासक याव्यतिरिक्त कुणीच लक्ष देत नाही. त्याकरिता वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे काम अधिक गतीने आणि लोकसहभागातून व्हावे यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. वृक्षारोपणाची चळवळ अधिक गतिमान करून नजीक परिसराला येणाऱ्या काळात वृक्षाच्छादित बनविण्यात प्रत्येकानी पुढाकार घेणं आवश्यक आहे.

                                        शिवाजी भोसले
                                        मो. 9689964143

Comments