आजची शिक्षणव्यवस्था टाकाऊ झालीय !

भारत देश महासत्तेच्या दिशेने पादक्रांत करीत आहे. ते इथल्या युवकांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर ... भारतिय युवकांच्या मनात प्रचंड इच्छाशक्ती, आशा आहे, पण या आशेला निराशेत परावर्तीत करण्याचे काम आमच्या शिक्षण व्यवस्थेने अगदी चोखपणे केलेले आहे. मुळात इथली शिक्षणव्यवस्था टिकावु नसून टाकावू स्वरुपाची झालेली आहे. आजच्या शिक्षणव्यवस्थेचा कल हा लोकाभिमुख रोजगार निर्मिती करण्यासाठी असायला हवा होता, परंतु तो शिक्षित बेरोजगार निर्मिती करण्याकडे अधिक असल्याचे दिसून येते. ज्या युवकांच्या हाताला त्यांचे पोट भरण्याचे साधन नाही असे युवक महासत्तेची स्वप्ने काय पाहणार? याचे आम्ही चिंतन मंथन करणे गरजेचे ठरते.

पूर्वी आमच्याच देशात अनेक महापुरुष, समाजसुधारक, विचारवंतानी तथाकथित व्यवस्थेविरिद्ध बंड पुकारुन इथल्या भूमीपुत्राना शिक्षण मिळावे म्हणून आग्रह धरला. ज्या इंग्रजानी सत्तेच्या मोहापायी आमच्यावर अन्याय केला अखेर त्यांनीच आम्हाला शिक्षण उपलब्ध करुन दिले हेही नाकारता येणार नाही. जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ‘असाध्य ते साध्य, करीता सायास ! कारण अभ्यास, तुका म्हणे !! थोर परिवर्तनवादी समाजसुधारक महात्मा फुलेनी तर ‘शिक्षण सक्तीचे व मोफत असावे' यासाठी जिवाचे रान केले. राजर्षी शाहू महाराजांनी लोक उद्धारक शिक्षण चळवळ उभी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी शिक्षणाला वाघिणीचे दूध संबोधलं. हे सगळे त्यानी का केले असेल, कारण शिक्षण हे असं रसायन आहे, कि ते माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतं. अंधकाराला बाजूला सारुन स्वविकासाचा नवप्रकाश दाखवतं. एखादा समाज शिकून सुशिक्षित, सुसंस्कारी झाला तर देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही.

आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये चित्रकला शिकविली जाते पण कधी चरित्रकला शिकविली जात नाही. जिवशास्त्र शिकविलं जात पण जिवनशास्त्र नाही. आम्हाला काटकोन, षटकोन, अष्टकोन, लघुकोन, त्रिकोन सर्व कोन शिकविले जातात पण जिवनाकडे पाहण्याचा 'सकारात्मक दृष्टीकोन' शिकविला जात नाही. आम्हाला उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, सरळ रेषा, सर्व प्रकारच्या रेषा शिकविल्या जातात पण गरीब आणि श्रीमंत यामधून जाणारी ‘समानता' नावाची रेषा शिकविली जात नाही. ज्या दिवशी वरील सर्व बाबी आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये अंतर्भूत होतील तो दिवस आमच्यासाठी क्रांतीचा ठरेल.

खरतरं ‘भारतीय शिक्षणाला’ समृध्द व वैभवशाली बनविण्याचा जिवंत व ज्वलंत वारसा याच मातीत घडला, वाढला, याच मातीला प्राचिनकाळी ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखलं जायंचं. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला अशी विश्वविख्यात विद्यापिठे याच भारतामध्ये होती. ही विद्यापिठ तात्कालीन कालखंडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांबरोबर पाश्चिमात्य विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. परंतू काळाच्या ओघात ही विद्यापिठे नामशेष करण्यात आली. या विद्यापिठांचा दप्तरखाना कित्येक दिवस जळत होता. त्यानंतर आमच्या शिक्षण व्यवस्थेला एकही असे विश्वविख्यात विद्यापिठ घडविता आलं नाही. ही खरी शोकांतिका आहे.

यापूर्वीच शिक्षण हे मानवी व्यक्तीमत्वाला सक्षम करणार होतं, पण तो काळ आता उरलेला नाही. आम्ही विकासाच्या अनेक पायऱ्या गाठल्यात पण, शिक्षणाची पायरी सक्षम करू शकलो नाही. कारण पूर्वी बहूजण समाजाकडं शिक्षण उपलब्ध नव्हतं पण जी काही साधन उपलब्ध होती त्यातून दर्जेदार शिक्षण घेतलं जायचं. आजच्या विद्यार्थ्याला पावकी, दिडकी, निमकी ही काय भानगड आहे याची पुसटशी कल्पनासुध्दा नाही. साधे तिसपर्यंत तोंडपाठही नाहित. कुठलीही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करावयाचा झाल्यास कॅल्युलेटर किंवा मोबाईलचा शोध आजच्या तरूणांना घावा लागतो, यासारखं दुदैव तरी कुठलं असावं.

शिक्षण ही राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती मानली जाते. शिक्षणाचा पाया सक्षम असल्यास राष्ट्राची इमारत कधीच डगमगू शकणार नाही. सक्षम शिक्षणावरच राष्ट्राचे उज्वल भविष्य अवलंबून असतं. आजच्या युवकांना गुवणत्त:पूर्ण शिक्षण देणं गरजेचं आहे. ते जर आम्ही देण्यास असमर्थ ठरलोत तर भारतासारख्या सशक्त राष्ट्राला भिकेचे डोहाळे लागल्याशिवाय राहणार नाही.

नालंदा, तक्षशिला नावाची विद्यापिठ या भारतात होती तेव्हा ती जागतीक क्रमवारीच्या बाबतीत प्रथम, द्वितीय स्थानावर होती. तेव्हा तर शिक्षणाचा प्रचार प्रसार आजच्या आधूनिक काळाइतका झालाही नव्हता. परंतू आजच्या वर्तमान काळामध्ये ४५ केंद्रीय विद्यापिठ, ३२४ राज्यविद्यापिठ, १३० अभीमत विद्यापिठ तर २०३ हून अधिक खाजगी विद्यापिठ आहेत. गल्ली ते दिल्लीच्या प्रत्येक शहरात विद्यापिठ नव्यानं उभं राहतयं परंतू खेदाची नव्हे तर अपमानाची बाब ही आहे की, इतकी सारी विद्यापिठ आमच्या देशामध्ये असतांना सुध्दा जागतिक क्रमवारीच्या बाबतीत सर्वोत्तम २०० विद्यापिठांमध्ये एकाही समावेश नाही. मग आमची शिक्षण व्यवस्था कुठल्या दिशेला जात आहे, यावर विचार करून बदल घडणार नाही तर त्यावर चिंतन, मंथन करून योग्य ती ठोस पाऊल उचलंणं गरजेचं आहे.

शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्यास शासन स्तरावर अनेक उपाय केलेतं. शिक्षणाचं बाजारीकरण केलं. महाविद्यालयांच्या सुसज्य इमारती व सुव्यवस्थित वर्गखोल्या निर्र्माण केल्यात. पण त्या इमारतीच्या आतमध्ये घडणारं राजकारण विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढिस कधीच पोषक ठरलं नाही. महाविद्यालय हे राजकारण व गुंडांचे अड्डे बनत चाललेत. प्राध्यापक, शिक्षक केवळ महाविद्यालयात उपस्थित राहतात पण वर्गावर येत नाहीत. तेही काय करणार ज्ञानग्रहण करण्यास विद्याथ्र्यीच कुठ उपलब्ध असतात, अशी ओरड होत जाते. एकुण ‘तेरा भी भला, मेरा भी भला’ अशी शिक्षणाची दयनीय अवस्था निर्माण करण्यात आली आहे.

दिवसेंदिवस भारतीय शिक्षणात सुधारणा घडतांना दिसून येतात पण त्या शिक्षणाचा नेमका उद्देश नोकरी करणे हाच असतो. आणि शिक्षणही त्याचं पध्दतीनं दिलं जातं. आज आमची पोरं या शिक्षण पध्दतीनं पास होतीलही, शेकडो पदव्या मिळवतील, सर्वोच्च स्थान पटकावतिलही पण ती जीवनाच्या परीक्षेत नापास होतील. याचा शोध व बोध घेणं गरजेचं आहे. मग त्यांच शिक्षण घेवून उपयोग तरी काय झाला? अर्ध वय, आयुष्य या शिक्षणात खर्ची घातल्यानंतरही शिक्षणाचं सार्थक झाल्यासारख वाटत नसेल तर असलं शिक्षण काय कामाचं ! 

खरंतरं जीवन जगण्याचं कौशल्य आजच्या शिक्षण व्यवस्थेनं निर्माण केल तर हाच युवक उद्या जग जिंकल्याशिवाय माघार घेणार नाही. जगामध्ये शाळेच्या, महाविद्यालयाच्या परीक्षेत नापास होणारी मूलं जीवनाच्या परीक्षेत पास होऊन जगप्रसिध्द झालीत. होतायेत. अशी कित्येक नावं आम्हाला सापडतील. ज्यांनी शिक्षणाचा उंबरठाही गाठला नाही ती माणसं जगावर राज्य करतांना दिसतात. कारण तेव्हाची पेरलेली मूलतत्वे टिकावू स्वरूपाची होती, टाकाऊ नाही. हे आम्ही लक्षात घ्यायला हवं. 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,
                 "नुसतं नको उच्च शिक्षण, 
                  हे ते गेले मागे युगी लपून
                 आत व्हावा कष्टिक बलवान, 
                  सुपूत्र भारताचा !! ’’ 
असं आमचं शिक्षण असावं. इतकीच अपेक्षा ...

                                         -- शिवाजी भोसले
                                            मो. ९६८९९६४१४३

Comments